१९६२ च्या गलवान येथील लढाईत सशक्त नेतृत्वाचे प्रदर्शन केलेले पराकोटीचे प्रयत्न आणि त्यानंतर एक युद्धकैदी - एवढीच कर्नल श्रीकांत हसबनीस यांची ओळख नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी कितीतरी पैलू या आत्मकथनातून शब्दांकित झाले आहेत. त्यांचे पूर्वज - पेशव्यांच्या सैन्यातील शंकराजी फडके हे वसईच्या लढ्यात मर्दुमकी गाजवलेले शूर सेनानी. या पराक्रमी सेनानीचा वारसा आणि विठ्ठलमाउलीवरची अपार भक्ती यांचे एक आगळेवेगळे रसायन ज्यांच्या धमनीतून वाहत होते, ते नाना आणि त्यांची अर्धांगिनी होऊन घेतलेला वसा पुरेपूर निभावून नेणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुजाता हसबनीस यांचा एकत्रित जीवनप्रवास एक वेगळे जीवनस्तोत्र शिकवून जातो. ज्यांच्याकडून भक्ती आणि शौर्याचे बाळकडू घेतले, ते आईवडील व हाच वारसा पुरेपूर निभावणारी त्यांची संतती अशा या संपूर्ण हसबनीस घराण्याचा जीवनप्रवास म्हणजे ‘परि तुझा मुद्रांकित'ची कहाणी.- श्रीमती वसुधा माझगावकर