कविता, कथा, कादंबरी आणि समीक्षा या चारही क्षेत्रात अर्थपूर्ण निर्मिती करणारे विलास सारंग आता नाटकाकडे वळले आहेत. या क्षेत्रातली त्यांची निर्मितीही, नव्या वाटा धुंडाळणारी आहे हे त्यांच्या ‘पपई पिकल्या का...’
या नाटकावरून सहज लक्षात येते. मानवी नातेसंबंधांवरची त्वचा छिलून काढणार्या या नाटकात एक असाह्य ताण प्रारंभापासून भरून राहिला आहे. मृत्युची जाणीव, जगण्यात हे क्रौर्य जगण्याला वेढून असलेली परात्मता, अनिश्चितता यांसारखी आशयसूत्रे या नाटकाला अर्थसघन करतात. त्यांच्यामुळे सारंगांच्या या नाटकाला तत्त्वचिंतनाचे परिमाणही प्राप्त झाले आहे. असे असूनही मूर्त अनुभवातील व्याकुळता वाचक-प्रेक्षकाला अस्वस्थ करणारी आहे.