पानिपतची तिसरी लढाई प्रामुख्याने अहमदशहा अब्दाली आणि भाऊसाहेब पेशवे (नानासाहेब पेशवे यांचे भाऊ) यांच्यात लढली गेली. काय होती या लढाईमागची कारणमीमांसा आणि का झाला मराठ्यांचा घोर पराभव, का झाली एवढी मनुष्यहानी, याचा वेध विश्वास पाटील यांनी ‘पानिपतचे रणांगण’ या नाटकातून घेतला आहे. पेशवाईचं समूळ उच्चाटन करण्यासाठी उत्तरेकडील मुस्लीम सत्ताधारी (अहमदशहा अब्दाली हा त्यातील प्रबळ पातशहा) एकवटले. त्यांचा सामना करण्यासाठी भाऊसाहेब पेशवे विश्वासरावांसह पूर्ण सज्जतेनिशी, आत्मविश्वासाने उत्तरेच्या मोहिमेवर गेले; पण नानासाहेब पेशव्यांचा गहाळपणा, मल्हारराव होळकर आणि अन्य सरदारांनी इब्राहिम गारदीच्या गोलाची लढाईला (लढाईची एक पद्धत) ऐन रणांगणात फासलेला हरताळ यामुळे मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात संहार होऊन त्यांना हार पत्करावी लागली. आपसातील लाथाळ्या केवढा प्रचंड राजकीय, आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक विध्वंस करू शकतात, हे दाहक वास्तव अधोरेखित करणारं नाटक.