खूप गोष्टी सांगणारी मावशी गावाला परत गेली आणि
मग मैत्रेयीला खूप रडू येऊ लागलं.
तिला गोष्टीतला सोनेरी केसांच्या असंख्य वेण्या घातलेला
गॉगल लावणारा सिंह आठवला.
रंगीत काचांचा चष्मा घातला की सगळं जग कसं रंगीत दिसतं,
याची तिला मजा वाटत होती, तेही आठवलं.
डोळ्यांचं काम काय? डोळ्यांनी दिसतं कसं?
सगळ्यांच्या डोळ्यांचा रंग वेगवेगळा का असतो?
आंधळा मासा शिकार कशी करतो?
अनेक प्रश्न तिच्या मनात होते.
सगळं जग पाहिलं पाहिजे, असं तिला वाटत होतं.
तेवढ्यात आजी म्हणाली, “लवकर घरी ये गं.
मी तुझी डोळ्यांत तेल घालून वाटत पाहत असते!”
डोळ्यांत तर काजळ घालतात ना…!
मग या वाकप्रचाराचा अर्थ काय?