....हे काय? मि. केव्हिनच्या हातात आज सिगारेट कशी नाही? आणि चहाचा मग कुठे गेला? केव्हिन आपल्या हातांकडे बघत बोटं चोळत होता. त्याच्या बोटांवर मि. सिंगना कसला तरी लालभडक डाग दिसला. क्षणभर त्यांना वाटलं, आज बहुतेक आपल्याला तांबडं संत्र मिळणार. त्यांना ती फार आवडायची. भारतातही ती मिळायची आणि नुकतंच त्यांना असंही कळलं होतं की, या दिवसांत ती कॅनडातही मिळतात. मि. केव्हिननंही तसलंच एक तांबडं संत्र कापलेलं दिसतंय. केव्हिननं आपले दोन्ही हात प्रकाशासमोर धरले. मि. सिंगना आता त्याच्या हाताला लागलेलं तांबडं द्रव चांगलं स्पष्ट दिसू लागलं, पण ते चांगलं घट्ट वाटत होतं, संत्र्याच्या रसासारखं पातळ दिसत नव्हतं. मि. सिंगच्या हृदयात धडधडू लागलं. ते रक्त होतं. त्यांनी काही तरी बोलायला तोंड उघडलं, पण तेवढ्यात केव्हिनच त्यांच्यापाशी आला. ‘‘मी मारलं तिला, मि. सिंग.’’ त्यानं हळूच म्हटलं.