मानवी अस्तित्तवाचा मूलाधार कोणता, अशी जिज्ञासा दिव्रिटो यांच्या मनामध्ये जागी झाली आणि तिचा शोध घेण्यासाठी त्यांनी पश्चिमेकडे प्रस्थान केले. प्राचीन आणि अर्वाचीन यांचा संगम साधणा-या युरोपीय भूमीवर ते मुक्तपणे हिंडले. त्या परिक्रमेचा हा आशयगर्भ आलेख. भेटणा-या माणसांशी संवाद करताना दिब्रिटो तटस्थ, कोरडे रहात नाहीत. ते त्यांच्या व्यथावेदनेशी सहजपणेच समरस होऊन जातात. एवढे भावबळ फारच थोड्यांना लाभलेले असते. म्हणून हे पर्यटन हौसेमजेसाठी केलेली मुशाफिरी ठरत नाही. त्याला भावोत्कट यात्रेचे एक निराळेच परिमाण प्राप्त होते. फादर दिब्रिटो यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही विशेषता इथे पानोपानी प्रत्ययास येते; वाचकाला खिळवून ठेवते.