सुविचारामुळे मन सुसंस्कारित होते; तसेच योग्य दिशा दाखविण्याचे कामही हे सुविचार करतात. सुविचारामुळे सकारात्मक विचार करण्याची सवय लागते; तसेच सदाचारही निर्माण होतो. मराठी लेखन करताना भाषा प्रगल्भ असणे आणि भाषेवर प्रभुत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. एखादा विषय मांडताना तो सरसकट न लिहिता, त्यात थोडे सुविचार, म्हणी किंवा वाक्प्रचार वापरल्यास विषयाचे सौंदर्य अधिकच खुलते. त्यामुळे प्रत्येक भाषेत सुविचार, म्हणी आणि वाक्प्रचारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बोलीभाषेतही यांचा उपयोग केल्यास आपले बोलणे, भाषण किंवा व्याख्यान प्रभावी होते, हे तितकेच खरे.प्रस्तुत पुस्तकात संत, समाजसुधारक, पाश्चात्य विचारवंत, साहित्यिक यांच्या सुविचारांचे संकलन केले आहे. निवडक ग्रंथांतील काही सुविचारांचाही यात समावेश आहे; तसेच जीवनोपयोगी वाक्प्रचार आणि म्हणी अर्थासह देण्यात आल्या आहेत. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य म्हणी व वाक्प्रचारांचा उपयोग करण्यास सर्वांनाच मदत होईल.