एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर ह्यांचे हे आत्मनिवेदन अनेक कारणांमुळे वाचकाला खिळवून ठेवते. वायुसेनेत असताना त्यांनी ज्या जोखमी स्वीकारल्या, श्वास रोखून ठेवणाऱ्या साहसी वृत्तीने जी अचाट कामगिरी केली; त्यामुळे हे पुस्तक कमालीचे उत्कंठा वाढवणारे आहे. पण त्याहीपेक्षा वायुसेनेत असताना चौकशीच्या दुष्टचक्रातून ते ज्या निर्धाराने निष्कलंक सिद्ध होऊन बाहेर आले, त्यामुळे हे पुस्तक वायुसेनेतल्या रोमांचक तपशिलाचे फक्त राहत नाही, तर एक नैतिक भूमिका ठामपणे घेऊन प्रस्थापित व्यवस्थेशी एका दुर्मीळ दिसणाऱ्या धैर्याने लढणाऱ्या एका प्रखर स्वाभिमानी, सत्यासाठी सर्वस्वावर तुळशीपत्र ठेवायला न कचरणाऱ्या तेजस्वी तरुणाचे आत्मवृत्तही ठरते. ह्या निवेदनातला रोखठोक सरळपणा असायलाही एक वेगळ्या प्रकारचे धैर्य लागते, तेही चाफेकरांजवळ काठोकाठ आहे. कमालीचे प्रामाणिक, थेट, प्रवाही शैलीतले हे निवेदन मराठी साहित्यात, त्यातल्या वेगळ्या आशयामुळे व त्याला असलेल्या नैतिक परिमाणामुळे, मोलाची भर घालीत आहे. महेश एलकुंचवार