प्रस्तुत पुस्तकात संजय आर्वीकर यांनी महेश एलकुंचवार, ना.धों.महानोर, कमल देसाई ह्या प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या थेटपणे घेतलेल्या सविस्तर मुलाखती आणि अरुण कोलटकर या श्रेष्ठ कवीसंबंधी घेतलेल्या सुधीर रसाळ, प्रकाश देशपांडे-केजकर व रवींद्र किंबहुने या समीक्षकांच्या मुलाखती समाविष्ट केलेल्या आहेत.
साहित्य व साहित्यनिर्मिती यांचे केंद्रस्थान अढळ असून एका चौकस व्यासंगी सूत्रसंवादकाने साकार केलेली ही विलक्षण विचारप्रवर्तक शोधसमीक्षा आहे.
या विस्तृत संवादसंहितेचे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य जाणवते ते म्हणजे, सूत्रसंवादक संजय आर्वीकर यांनी चारही साहित्यिकांवरील उपलब्ध समीक्षेचाही केलेला डोळस अभ्यास.
सृजनशील साहित्यिक, त्यांचे समीक्षक व स्वत: आर्वीकरांमधील सुजाण साहित्यमीमांसक अशा तीन पण एककेंद्री वर्तुळातून या मुलाखती सघन होत जातात आणि अखेर एका व्यापक ऐतिहासिक-सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात आपापल्या जागी उभ्या राहतात. साहित्याचा अभ्यास हाच संस्कृतीचाही अभ्यास असतो व ठरतो याची निर्विवादपणे तर्कशुद्ध प्रचिती देणारा हा वाङ्मयीन ऐवज आहे.
- प्रा.रा.ग.जाधव