चारशे वर्षांपूर्वी इस्तान्बूल या शहरात घडणारी ही रहस्यकथा आहे. पण तिच्या पार्श्वभूमीवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्तर आहेत. इस्लामिक लघुचित्रकलेचा अभ्यासपूर्ण इतिहासच या कादंबरीद्वारे आपल्याला वाचायला मिळतो. फारसी कलापरंपरेतलं बायझाद आणि इतर महत्वाच्या चित्रकारांचं माहात्म्य, त्यांची माहिती, फारसी चित्रकलेवर चिनी चित्रकलेतल्या मंगोलांचा पडलेला प्रभाव, धर्मानं कलेवर घातलेली बंधनं, त्यातून तत्कालीन कलेनं शोधलेल्या पळवाटा, धर्म आणि कला यांच्यात असलेला सततचा ताण या सगळ्या ऐतिहासिक संदर्भांचा अस्सल लेखाजोखाच या कादंबरीत आपल्याला गवसतो. कादंबरीतील पात्रांच्या चर्चांमधून शैली, कला आणि नैतिकता, समाज, धर्म, कलावंताचं अंधत्व, याविषयीची मतं आणि मतांतरं काय असतील याविषयी आपल्याला अंदाज येतो. पूर्वेतला आणि पश्चिमेतला संघर्ष हा या कादंबरीचा महत्वाचा अक्ष आहे. पाश्चिमात्य कलेचा प्रभाव, देशी कलापरंपरेचं भविष्य आणि यातून उत्पन्न होणाऱ्या अस्वस्थतेची सावली कादंबरीतल्या संपूर्ण घटनाक्रमावर पडून राहिलेली आपल्याला दिसते. त्यामुळे नऊ हिवाळी रात्रीत वीसेक प्रमुख सजीव-निर्जीव पात्रांसह येणाऱ्या असंख्य पात्रांसह ही कादंबरी एक विराट सामाजिक-भौगोलिक-सांस्कृतिक आणि राजकीय पट उभा करते.