लातूर पॅटर्नचे जनक, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे
संस्थापक कुलगुरू, निग्रो साहित्य आणि पाश्चिमात्य भाषांचे अभ्यासक, लातूर नगरपालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष म्हणून डॉ. जनार्दन वाघमारे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.
जन्म आणि कार्यकर्तृत्वाची भूमी मागासलेली पण सकारात्मक संघर्ष,
ज्ञानलालसा व बहुजनांच्या अस्मितेची तळमळ यामुळे डॉ. वाघमारे यांचे
व्यक्तिमत्त्व अधिक लक्षवेधी ठरले. मराठवाड्यातील समाजजीवन व
परिवर्तनवादी चळवळींना त्यांनी सतत विवेकपूर्ण वैचारिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मूठभर माती’ हे डॉ. वाघमारे यांचे केवळ साधारण आत्मचरित्र नसून ते
शैक्षणिक आत्मचरित्र आहे, तसेच नवमहाराष्ट्र निर्मितीनंतर मराठवाड्यातील ज्ञान-विज्ञान शाखा, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चढ-उतारांचे सक्रीय साक्षीदार असलेल्या डॉ. वाघमारे यांची ही जीवनयात्रा एक सामाजिक दस्तऐवजही आहे.