भारतीय एकात्मतेचे शिल्प घडविणार्या मुसलमान मराठी संतकवींचा हा विस्तृत साधार परिचय मराठीत केवळ अपूर्व आहे. लेखकाने इथे ज्ञात, अल्पज्ञात आणि अज्ञात अशा मुसलमान मराठी संतकवींच्या चरित्र-चारित्र्याचा आणि वाणीचा साक्षेपाने शोध घेऊन अत्यंत जिव्हाळ्याने त्यांचे दर्शन घडविले आहे. सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन एकात्मतेची घडण करणार्या मुसलमान मराठी संतकवींनी हिंदू संतांना उत्कट सहयोग दिला आणि भारताची उदार व समन्वयशील सांस्कृतिक परंपरा समृद्ध करण्यात मोठा वाटा उचलला. या पुस्तकात शहा मुंतोजी ब्रह्मणी, हुसेन अंबरखान, अलमखान, शेख सुलतान, शेख महंमद, शहा मुनी आणि इतर अनेक मुसलमान मराठी संतकवींचे वेधक दर्शन आपणांस घडेल