नाही!! नाही! मी सूतपुत्र नाही. राधेय नाही. एकशेएकावा कौरव नाही. कौंतेय आणि पहिला पांडव तर नाहीच नाही. मी– मी सूर्यपुत्रही नाही!! मी– मी आहे एक प्रचंड शून्य!! प्रचंड शून्य!! ज्याला नसतात बंधू-बंधनं, नसते माता-ममता, नसते आवश्यकता कुठल्याही कुळाची– कसल्याच वारशाची, ज्याला नसतात मान- अवमान– आत्माभिमान– कसले कसलेच भाव! ‘कऽर्ण, कऽर्ण’ एक प्रचंड शून्य! जन्म नसलेलं, मृत्यू नसलेलं! राधा-कुंती, वृषाली- पांचाली, शोण, अर्जुन, घोडा-सूर्य, सर्वा-सर्वांनाच सामावून घेणारं! सर्वापार गेलेलं! कशाकशातच नसलेलं! एक प्रचंड शून्य!