माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाने प्रत्येक भारतीय हळहळला. त्यांच्या निधनामुळे प्रबळ विज्ञाननिष्ठा असलेला एक थोर भारतीय संशोधक, विचारवंत, शिक्षक आणि निर्मळ मनाची व्यक्ती आपण गमावली. ही एक देशासाठी समर्पित असलेल्या जीवनाची अखेर आहे. रामेश्वरम खेड्यातील एक गरीब नावाड्याचा मुलगा अथक प्रयत्नानं, जिद्दीन, आत्मविश्वासानं आणि परमेश्वरावरील श्रद्धेनं विद्येची कास धरतो आणि भारताचा ‘मिसाइल मॅन’ होतो.राष्ट्रपतीपदावर विराजमान असताना शालेय विद्यार्थ्यांमध्ये तसेच तरुणांमध्ये अफाट अशी लोकप्रियता त्यांना लाभली व आजही आहे. उपलब्धा साधनसंपत्ती आणि नव्या तंत्रज्ञानानं आज भारत जागतिक स्पर्धेत मानाने उभा आहे. याचे श्रेय डॉ. कलाम आणि भारतीय शास्त्रज्ञांची जिद्द आणि अथक परिश्रमाला द्यावे लागेल.भारतीयांना महान स्वप्न पहायला लावणारी, अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारी त्यांची जीवनगाथा आहे. या पुस्तकाची सुधारित आवृत्ती त्यांच्या कार्यकर्तृत्वास समर्पित!