इतिहासाची आणि मानवाच्या आदिमतेची पाळमुळं शोधणारं खातं म्हणजे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खातं. या खात्यात पुरातत्त्ववेत्ता म्हणून काम करताना के.के.मुहम्मद यांनी विलक्षण अनुभवांची शिदोरी जमा केली आहे. अयोध्येतलं वादग्रस्त उत्खनन असो की ताजमहल परिसरातला व्यापारी संकुल उभारणीचा तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींचा घाट उलथवून लावणं असो, मुहम्मद यांचा कार्यकाळ आव्हानांनी भरलेला आहे. यात अगदी चंबळच्या खोऱ्यातील डाकूंचा सामना करत वटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही प्रसंग आहेत. त्यामुळं हे आत्मकथन जणू भारतीय इतिहासाची सफर घडवत एका संशोधकाचा प्रवास मांडतं.