जे. बी. एस. हाल्डेन हे विज्ञान लोकप्रिय करणाऱ्यांत प्रमुख होते. शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे विज्ञानातील योगदान शरीरशास्त्र, जीवशास्त्र आणि आनुवंशशास्त्र या तीन क्षेत्रांत आहे. त्यांनी २४ पुस्तके लिहिली. ४०० हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध आणि असंख्य लोकाभिमुख लेख त्यांनी लिहिले. त्यांचं लोकाभिमुख लिखाण अतिशय सोपं असे. मूळ अर्थामध्ये कोणताही फरक पडू न देता विज्ञानातील संकल्पना अतिशय सुबोध करून मांडण्यात त्यांची हातोटी होती. १९३७ मध्ये ‘माय फ्रेंड मि. लीकी’ प्रथम प्रसिद्ध झाले. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेलं हे एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकात हाल्डेन यांनी रंगवलेले ‘मिस्टर लीकी’ हे जादूगाराचे विलक्षण पात्र मुले कधीच विसरू शकत नाहीत. आतापर्यंत जवळपास तीन पिढ्यांनी ‘माय फ्रेंड मि. लीकी’ चा आनंद घेतला आहे. अशी पुस्तकं नेहमीच आनंद देतात.मिस्टर लीकी हा आहे एक अद्भुत जादूगार. तो हवं तेंव्हा अदृश्य होऊ शकतो. प्रवास करण्यासाठी त्याच्याकडे आहे एक अतिशय उपयोगी अशी जादुई चटई आणि आग ओकणारा लहानसा ड्रॅगनही. हा जादूगार प्राण्यांवर चेटूक करून त्यांना आपलं गुलाम बनवतो, आपल्या जादुई चटईवरून इकडून तिकडे उडत राहतो आणि कधी कधी अदृश्यही होतो.चला तर मग वाचू या ‘मिस्टर लीकी’ या अद्भुत जादूगाराची ही अद्भुत गोष्ट.