‘लाखाची गोष्ट’ या कथेतील कंगाल नायकासमोर आव्हान आहे लंडनसारख्या शहरात दहा लाख पौंडाच्या नोटेच्या आधारे एक महिना तग धरून राहण्याचं. तो यशस्वी होतो का? ‘ऑनलाइन शुभमंगल’ कथेत अमेरिकेतील दूरदूरच्या दोन टोकांच्या शहरातील युवक-युवती एकमेकांना न पाहता टेलिफोनवरून माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडतात; पण त्यांच्या प्रेमात कोणीतरी बिब्बा घालतं. काय होतं पुढे? ‘परतीची वाट’ या कथेतील हेन्री आपल्या घरात आलेल्या अतिथीला आपल्या माहेरी गेलेल्या बायकोविषयी सांगत असतो. तिच्या येण्याची अतिथीही औत्सुक्याने वाट पाहत असतो. येते का ती?... ‘एक डाव भुताचा’ ही कथा पुतळ्याच्या भुताभोवती फिरते... ‘मृत्यूची गोल चकती’ ही कथा, आपल्या पित्याला फाशीच्या शिक्षेपासून वाचवणाऱ्या निरागस मुलीची आहे...मार्क ट्वेनच्या रंगतदार शैलीतून साकारलेल्या आणि अंतर्मुख करणाऱ्या कथांचा संग्रह.