डॉ. विद्यागौरी टिळक व डॉ. अंजली जोशी या दोघींनी कै. रा. काशीनाथ नारायण साने यांनी १८९६ साली ‘‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’’ या विषयावर दिलेले व्याख्यान ‘केसरी’च्या जुन्या ङ्गायलींमधून संशोधून प्रकाशित केले ही ङ्गार मोलाची गोष्ट होय. ‘काव्येतिहाससंग्रहा’चे संपादक म्हणून ख्यातकीर्त पावलेले कै. साने हे केवळ इतिहास साधनांचे संकलक नव्हते तर मराठ्यांचा इतिहास आणि महाराष्ट्र-संस्कृती या विषयांचे व्यासंगी अभ्यासकही होते, हे या त्यांच्या प्रस्तुत व्याख्यानावरून कळते. त्यांच्याकडे इतिहासलेखनासंबंधी तसेच मराठेशाहीतील वाङ्मयनिर्मितीकडे पाहाण्याची नवीच दृष्टी होती हेही या व्याख्यानावरून ध्यानात येते. त्यामुळेच हा ग्रंथ मराठी भाषा, मराठी वाङ्मय, मराठ्यांचा इतिहास आणि महाराष्ट्र-संस्कृती इत्यादी विषयांच्या सर्वच अभ्यासकांना आणि संशोधकांना एक महत्त्वपूर्ण अभ्यास-स्रोत ठरणारा आहे. - डॉ. द. दि. पुंडे