हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी मराठी साहित्याचा मराठी समाजाशी आणि संस्कृतीशी कोणकोणत्या प्रकारचा संबंध असतो, त्या संबंधातून कोणकोणते वाङमयीन प्रश्न उपस्थित होतात, त्या प्रश्नांना कोणकोणत्या दृष्टीने सामोरे जावे लागते, याची मीमांसा मराठी साहित्यातील वस्तुस्थितीच्या आधारे केलेली आहे. या मीमांसेतूनच आधुनिक मराठी साहित्याचे आरंभापासून ते अगदी आजच्या वर्तमान वास्तवापर्यंतचे सामाजिक, सांस्कृतिक व वाङमयीन स्वरूप आपल्या मनासमोर स्पष्टपणे उभे राहते. या अंगाने मराठी साहित्याच्या मर्यादा व वैशिष्ट्ये स्पष्ट होताना जाणवतात. कादंबरीच्या निर्मिति प्रक्रियेविषयीची मीमांसाही या ग्रंथात प्रा. यादवांनी अनेक कादंबरीकारांच्या मुलाखती घेऊन केलेली आहे. त्यामुळे हा ग्रंथ जाणकार रसिक, मराठी वाङमयीन अभ्यासक, समीक्षक, विद्यार्थी व तरुण साहित्यिक या सर्वांनाच मोलाचा वाटेल, असा झालेला आहे.