‘मोडक्या आभाळखालची माणसं’च्या पाठोपाठ येणारे प्रा. वसंत कोकजे यांचे हे दुसरे ललित पुस्तक. यात दुसर्या महायुद्धाच्या आसपासच्या काळातल्या नेरळसारख्या खेड्यातील कनिष्ठ आर्थिक स्तरातील व्यक्तींच्या व्यथावेदनांची चित्रे रेखाटलेली आहेत. ‘व्यक्तिचित्रा’त फक्त व्यक्ती नसते तर व्यक्तीच्या भोवतीची सामाजिक, आर्थिक परिस्थिती, श्रद्धा-समजुती आणि एकमेकांत गुंतलेली जीवने व मने यांचीही अभिव्यक्ती अपरिहार्यपणे होत राहते. आपल्या उमलत्या नि उमेदीच्या वयात वसंत कोकजे यांनी तो काळ अन् ती माणसे समरसून पाहिली-अनुभवली आहेत. त्यामुळे आपसूकपणे त्यांच्या कथाव्यथांचा एक प्रत्ययकारक आलेखच त्यांच्या या संग्रहातून आपल्यासमोर येतो. या सर्वच व्यक्तींमध्ये आपलीही वाचक म्हणून गुंतवणूक होत जाते. व्थथावेदनांनी डवरलेली ही माणूस नावाची झाडं आपल्यासारख्या वाचकांना गारवा देण्यापेक्षाही अंतर्मुखतेच्या सावल्यांमध्येच जास्त उभी करतात.