मन असे कसे, कांद्याचे पापुद्रे जसे!’कोण्या अज्ञात कवीच्या या ओळी मनाचं यथार्थ वर्णन करतात. मात्र थांग न लागणार्या मनाची मानसशास्त्रीय संकल्पना आणि पद्धती यांच्याद्वारे चिकित्सा केल्यास अनेक मनोव्यापारांचा वेध घेता येतो. ३५ वर्षांहून अधिक काळ मानसतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून काम करणार्या डॉ. विजया फडणीस यांनी या लेखसंग्रहातून मनुष्यस्वभाव, मनोविकार, मानसोपचाराच्या विविध पद्धती आदींचा वेध घेतला आहे. विशेष म्हणजे फ्रॉइडचे स्वप्नाचे सिद्धान्त, रिअॅलिटी थेरपी आदी मानसशास्त्रीय संकल्पना किंवा डिप्रेशनसारखे मनोविकार आदी गोष्टी विशद करताना त्यांनी आपल्या लेखांना अनुभवांची जोड दिली आहे. त्यामुळे हे लेख माहितीपूर्ण, तसंच मर्मदृष्टी देणारे व रंजक झाले आहेत. या लेखांमधून फडणीस यांनी विविध मानसोपचारतंत्राचा वापर कसा करावा, हेही साध्या-सोप्या शब्दांत सांगितलं आहे. त्यामुळे वाचकांबरोबरच मानसशास्त्राचे विद्यार्थी व शिक्षक यांनाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.स्वभावाचे विविध नमुने मांडणारा, सकारात्मक वास्तववादी दृष्टिकोन देणारा मौलिक लेखसंग्रह… मनं उलगडताना !