प्रा. नवनाथ शिंदे यांनी प्रस्तुत ग्रंथात माणकेश्वर येथील ‘शिवसटवाई’ या देव-देवतांचा आणि मंदिराचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास सांगितला आहे. हा इतिहास मांडताना त्यांनी लिखित सामग्रीबरोबरच मौखिक सामग्रीचाही यथायोग्य वापर केला आहे, त्यामुळे ऐतिहासिक मांडणी साधार झाली आहे. त्याचप्रमाणे येथे साजरे केले जाणारे उत्सव, पाळली जाणारी विधिविधाने, रूढ असणार्या प्रथा-परंपरा, विविध प्रसंगी म्हटली जाणारी लोकगीते-भक्तिगीते अशा सर्व गोष्टींचा तपशीलवार परामर्श या ग्रंथात घेतलेला आहे. देवदेवतांच्या आख्यायिका,लोककथा, लोकगीते यांचे संकलन करून त्यांचाही समावेश ग्रंथात केलेला दिसतो. अनेकवेळा देवदेवतांवर ग्रंथ लिहिताना अभ्यासक भाविक होतो, श्रद्धा चिकित्सेच्या आड येण्याची शक्यता असते. प्रा. नवनाथ शिंदे भावनिक न होता तटस्थपणे इतिहासाची मांडणी करतात हे मला फार महत्त्वाचे वाटते.