मानवी मन हा सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय आहे. साहित्यिकांपासून ते तत्त्ववेत्त्यांपर्यंत सर्वांनाच मनाने भुरळ घातली आहे. अनेकांनी मनावर भरभरून लिहिलेही आहे. मनाबद्दल कुतूहल वाटणारेही मनच आहे व त्याबद्दल लिहिणारेही मनच आहे. थोडक्यात, मनाच्या उगमापासून ते निर्मितीपर्यंत सर्वत्र मनाचेच साम्राज्य आहे. त्यामुळे मनाच्या वेगवेगळ्या उपपत्तींपासून ते मनाला देण्यात येणार्या उपदेशांपर्यंतचे असंख्य विषय वाचकांपुढे खुले झाले आहेत.
मनाचा पसारा खूप मोठा आहे. अशा मनाला आवाक्यात घेणे आणि त्यावर लिहिणे हे जितके चित्तवेधक आहे, तितकेच ते अवघड आहे. अंतर्मुख होऊन मनाचे सखोल परीक्षण केल्याशिवाय ते शक्य होणार नाही. प्रस्तुत लेखकाने हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे.
हे लघुलेख म्हणजे मनाबद्दलच्या आत्मचिंतनातून स्फुरलेले विचार आहेत. मनाच्या व्यापक पातळीवर जाऊन घेतलेल्या शोधातून केलेले हे मुक्तचिंतन आहे.
साहित्य, लोकसाहित्य, मानसशास्त्र, अध्यात्म, तत्त्वज्ञान अशी अनेक दालने किलकिली करून मनाच्या असंख्य पैलूंचे विशाल दर्शन वाचकांना घडवून आणणारा हा शोध आहे. एका भावमग्न, गंभीर अवस्थेत मनात आलेले एकेक तरंग या लघुलेखांत लेखकाने टिपले आहेत.
- डॉ. अंजली जोशी