पूर्वजन्मीचे पुण्य म्हणा, कारवारसारख्या निसर्गरम्य आणि त्यावेळी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या परिसरामुळे म्हणा किंवा धार्मिक आणि रसिक कुटुंबात जन्म घेतल्यामुळे म्हणा, बालपणीच माझ्यावर सरस्वतीने आपला वरदहस्त ठेवला आणि अकरा-बाराव्या वर्षी मी मराठी आणि कोंकणीतून कविता लिहू लागलो. अठराव्या वर्षी मी कन्नडमध्ये लिहिलेली,जय गोमंतक. ही कादंबरी बेंगळूरहून
प्रकाशित झाली. या सुमारास मी कथालेखनही करू लागलो आणि काय आश्चर्य, माझ्या कथा नामवंत मासिकात छापूनही येऊ लागल्या!
माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कन्नडमधून झाले. मराठी शाळेची पायरी मी कधीच चढलो नाही! मात्र मराठी वाचनाची गोडी लागली, नव्हे वेडच लागले...
माझ्या कथांचे हे छोटेसे विश्व, जे इतकी वर्षे मी उराशी सांभाळून ठेवले होते. आज ते पुन्हान्हा नव्या पिढीला सुपूर्द करीत आहे...
ही माझी आयुष्याची कमाई आहे आणि तिने मला नेहमीच अपूर्व असा आनंद दिलेला आहे...