अविनाश डोळस हे या युगाशी आणि या युगाच्या युगांतरकारी जनतेशी पूर्णपणे संबंद्ध असलेले लेखक आहेत. त्यांनी महासंगर या कथासंग्रहातील कथांमध्ये विषमतापूर्ण हिंदू समाजाचे अंत:करण आणि विसाव्या शतकाशी संबंद्ध असलेल्या युगांतरकारी जनविभागाचे हृदगत् मांडलेले आहे. ते मांडताना त्यांनी कलावंताचा चिकित्सकपणा जसा राखलेला आहे तसाच सच्चा कलावंताचा तटस्थपणाही राखलेला आहे.
वास्तविक जीवनात कार्यकर्ते आणि पुढारी असलेल्या डोळसांच्यालेखनात त्यांचे कार्यकर्तेपण/पुढारीपण दिसत नाही, तर एका सायंटिस्टची तटस्थता दिसत आहे. त्यांची भाषाशैली ही या वृत्तीतूनच आलेली आहे. ती एखाद्या जात्यावरल्या ओव्या, म्हणजे स्वजीवन व्यक्त करणार्या स्त्रियांच्या भाषाशैलीप्रमाणे आहे. ही शैली काव्यात्म व करुणात्मक आहे. परंतु हे काव्य आणि कारुण्य गोष्ट संपल्यानंतर क्रांतीसारखे स्फोटक आणि भव्य आहे असे जाणवत असते. आपण या कथा वाचाल तेव्हा माझ्याप्रमाणेच आपल्याला एका करुणेचा,
क्रोधाचा, क्रांतीचाही स्पर्श आपल्या हृदयाला झाला आहे असे जाणवेल.
- बाबुराव बागुल