थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, प्रसिद्ध लेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रिय असे व्यक्तिमत्त्व म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींचे साहित्य म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला अमूल्य ठेवाच. ‘‘श्यामची आई, भारतीय संस्कृती, धडपडणारा श्याम, सुंदरपत्रे’’ असे अनेक अजरामर साहित्य त्यांच्या हातून लिहिले गेले. याबरोबरच त्यांनी भारतातील इतर भाषेतील श्रेष्ठ साहित्य अनुवाद करून मराठी वाचकांना उपलब्ध करून दिले.साने गुरुजींच्या काही पुस्तकांपैकीच एक पुस्तक म्हणजे ‘महान व्यक्तींच्या जीवनकथा.’ प्रस्तुत पुस्तकाचे मूळ नाव आहे, ‘हिमालयाची शिखरे.’ या पुस्तकात भारतातील थोर राजे, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची जीवनगाथा मांडण्यात आली आहे. वाचकांना पुस्तकाची उपयुक्तता लक्षात यावी या हेतूने पुस्तकाचे नाव बदलून ‘महान व्यक्तींच्या जीवनकथा’ असे ठेवले आहे.त्या त्या व्यक्तींचे थोर विचार सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी कसे उपयुक्त आहेत, या दृष्टीने विचार करण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरेल. साने गुरुजींच्या विचारांचे आचरण म्हणजेच या पुस्तकाचे यश.