महाभारताने भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील काही अविस्मरणीय महिला निर्माण केल्या. महाभारतातील प्रत्येक स्त्रीचे वैशिष्ट्य वेगळे आहे, श्रद्धा व जीवनमूल्येही वेगळी आहेत. काही स्त्रिया अतिशय प्रसिद्ध व परिचित आहेत, तर काही फारशा प्रसिद्ध नाहीत. प्रस्तुत लेखसंग्रहात लेखिकेने अलक्षित स्त्रियांचाही समावेश केला आहे.
या संग्रहातील लेख महाभारतकालीन केवळ स्त्रियांचाच नव्हे, तर संपूर्ण संस्कृतीचाच परिचय घडवून आणतात. सर्व सामाजिक थरातील स्त्रियांचे बहुविध दर्शन वाचकांस येथे घडते. यातील स्त्रियांच्या चरित्रांतून स्पष्ट होते की, आज प्रचलित असलेली धर्मसंकल्पना महाभारतातील एकाही स्त्रीपुढे नव्हती. नीति-अनीतीच्या कल्पनाही वेगळ्या होत्या, परंतु एका उदात्त व विवेकी संस्कृतीचा त्यांना ध्यास होता.महाभारतकालीन स्त्रियांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा हा संग्रह महाभारतविषयक चिंतन व आकलन वाढविण्यास मदत करणारा आहे.