प्रस्तुत ग्रंथात मध्ययुगीन धर्मसंकल्पनांच्या विकासाचा, उत्क्रांतीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न डॉ. सुधाकर देशमुख यांनी केला आहे. वैदिक परंपरेचा अभ्यास अधिक प्रमाणात झाला असला तरी तंत्र आणि तंत्रपरंपरा यांचा झाला नाही. ही उणीव येथे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तंत्र, योग आणि भक्ती यांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकतानाच भारतातील ह्या संकल्पनांचा शोध घेतला आहे. वैदिक धर्म, तंत्र व बौद्ध आणि जैन धर्म यांच्या परस्पर समन्वयातून अनेक संप्रदाय निर्माण झाले. धर्मसंकल्पनाही बदलत गेल्या. त्यांच्या विचार-विकासाच्या बदलत्या स्वरूपाची चर्चा येथे केली आहे. अशा विचार-विकासाच्या संदर्भात ज्या गोष्टींचे योगदान आहे, अशा गोष्टींचा ऊहापोह लेखकाने अतिशय सविस्तर केला आहे. ह्या ग्रंथाच्या निमित्ताने अलक्षित असे एक अभ्यासक्षेत्र पुन्हा चर्चेत आले आहे.