लोकसंस्कृतीची जडण-घडण, तिचा होत गेलेला विकासक्रम, उपास्य देव-देवतांविषयीची भावना आणि आपल्या पूर्वजांची जीवनशैली यासाठी आपली लोकसंस्कृती जाणून घेणे आवश्यक आहे. ह्या पुस्तकातील लेखांत लोकसंस्कृतीचा केवळ परिचय करून दिलेला नाही, तर त्यातील सश्रद्ध भावनांमागे दडलेला समृद्ध अर्थही स्पष्ट केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये लोकसंस्कृतीमधील श्रद्धा, पूजा आणि उपासना यांचा परिचय अधिक प्रमाणात घडविला आहे आणि त्याचा समाजमनावर होणारा परिणाम, त्यामुळे त्याचा लोकजीवनाच्या जीनवशैली व जीवनधारणांवर पडलेला प्रभाव, याची चर्चा व विवेचन ह्या ग्रंथात केले आहे. ह्यामुळेच ह्याच विचारांवरील डॉ. द. ता. भोसले यांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा या दोन पुस्तकांपेक्षा ह्याचे स्वरूप व मांडणी भिन्न आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांना हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल यात शंका नाही.