प्रस्तुत पुस्तकातील काही लेखांतून लोकसाहित्य ही प्रयोगसिद्ध वाङ्मयकला कशी आहे, हे अधिक स्पष्ट केले आहे. ह्या वाङ्मयकलांमधून विविध लोककलांची निर्मिती कशी झाली तसेच ती कला सादर करताना त्यांची मूळ संहिता कशी बदलत जाते, ह्याही गोष्टी काही लेखांतून स्पष्ट केल्या आहेत. बदलत्या काळानुसार लोककथांचे संदर्भ कसे बदलत जातात याची जाणीव काही लेखांतून होते. अभिजात आणि ललित साहित्याशी लोकसाहित्याच्या असलेल्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकणारे काही लेख ह्या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. एकूणच तेवीस लेखांतून लोकसाहित्याच्या जाणकार अभ्यासकांनी लोकसाहित्यविषयक विविध विषयांवर केलेली चर्चा हे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. सर्व लेखांना त्या त्या लेखकांचे चिंतन व त्यांचा क्षेत्रीय अभ्यास याचा स्पर्श झालेला आहे.