आज स्त्रियांच्या काव्याला समग्र मराठी काव्याचा एक उपप्रवाह म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. एकेकाळी 'अंतर्गृहातील कविता' हे स्त्रियांच्या काव्याचे स्वरूप होते.
आज बीजिंग येथील आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत सहभागी झालेल्या स्त्रीची कविता वाचायला मिळते.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणात आदिवासी स्त्रियांचे काव्यसंग्रहही प्रकाशात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर
प्रकाशित होणार्या स्त्रियांच्या काव्याचा समग्रपणे चिकित्सक विचार करणे, हे समकालीन समीक्षकांपुढे असलेले एक आव्हान आहे.
डॉ. नीलिमा गुंडी यांनी 1950 ते 2000 या कालखंडातील स्त्रियांच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास एका जिज्ञासू संशोधकवृत्तीतून केला आहे. हे पुस्तक वाचताना काव्यातून व्यक्त झालेल्या स्त्रीच्या आंतरिक जीवनाचे दर्शन वाचकांना घडेल. स्त्रीच्या जगण्याची बदलती परिभाषा यातून वाचता येईल. तसेच काळ आणि सांस्कृतिक पर्यावरण यांचे काव्याशी
असलेले अनुबंधही यातून उजेडात येतील.
लाट ही स्त्रीत्वाची एक प्रतिमा. म्हणूनच या पुस्तकाचे शीर्षक आहे, 'लाटांचे मनोगत'. अभ्यासकांबरोबरच सर्व कवी, कवयित्री आणि रसिक यांनाही हे मनोगत जाणू घ्यावेसे वाटेल.