कृष्णांबद्दल ओशो सांगतात - कृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी जन्मले; पण ते पाच हजार वर्षं पुढे होते. इतर संत-महात्म्यांचा कल विरक्तीकडे होता; पण कृष्ण मात्र भरभरून जगायला सांगतात आणि भरभरून जगतानाही आव्हानांना सामोरं जायला शिकवतात. ज्या कृष्णांनी कौरव-पांडव युद्ध टाळायचा प्रयत्न केला, म्हणजे एक प्रकारे हिंसेला नकार दिला, त्याच कृष्णांनी ऐन युद्धाच्या वेळी कच खाणाऱ्या अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं, म्हणजे हिंसेला सामोरं जाण्याचं बळ दिलं. कृष्ण एकमेव असे आहेत जे जीवनाला पूर्णत्वाने स्वीकारतात. म्हणूनच सामान्य माणसालाही ते परिपूर्णतेने जगायला शिकवतात आणि जीवनरूपी द्वंद्वाला भिडायलाही शिकवतात. ओशोंच्या मते विरक्त होणं, शांतीचा मार्ग धरणं हे चुकीचं नसलं तरी त्यातून जीवनापासून पळण्याची एक वृत्ती दिसते. त्याउलट कृष्ण जीवनाला निर्भयपणे सामोरं जायला सांगतात. कृष्णांचं इतर संत-महात्म्यांच्या तुलनेतील वेगळेपण ओशोंनी विविध उदाहरणांतून, विवेचनातून या पुस्तकाद्वारे स्पष्ट केलं आहे.