विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत संशोधन करताना शास्त्रज्ञ जात, धर्म, देश, भाषा, स्थळ, काळ यांची बंधने विसरून झपाटून काम करत असतात. सामान्य माणसाचे झपाटणे आणि शास्त्रज्ञाचे झपाटणे याच्यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते. अज्ञाताचा शोध आणि मानवी कल्याणाचे सूत्र डोळ्यासमोर ठेवून ते अखंडपणे प्रयोग आणि अभ्यास करतात. परंतु शास्त्रज्ञांमध्येही सर्वसामान्य माणूस दडलेला असतो. सामान्य माणसांसारख्याच भावभावना असलेल्या शास्त्रज्ञांच्या जीवनात यशापयशाचे चढउतार, आशानिराशांची वळणे येतात. त्यांच्या ‘झपाटलेपणामुळे’ त्यांच्यावर मानापमानाचे प्रसंग येतात; पण त्यामुळे विचलित न होता अधिक चिकाटीने, अथक परिश्रम करून ते आपले ध्येय गाठतात. संशोधकांनी मानवी कल्याणासाठी केलेल्या महान कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जीवनातील काही रंजक घटना व प्रसंग किश्शांच्या स्वरूपात या पुस्तकात संकलित केले आहेत. वाचकांना त्यामुळे शास्त्रज्ञांची ‘खरी ओळख’ पटण्यास मदत होईल.