सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा खास मुलांसाठीचा हा नवा कथासंग्रह... ‘खळाळता अवखळ झरा!’ यातील सर्व कथा मनोरंजक तर आहेतच, पण रंजनाबरोबर त्यात विज्ञान, भाषाज्ञान, जीवनमूल्ये, सामाजिक भान वगैरे कथेच्या ओघात स्वाभाविकरीत्या येत असल्याने मुलांकडून सहजगत्या आत्मसात होण्याजोग्या गोष्टी आहेत. कथांच्या ओेघातच मुलांनी आनंदाने म्हणाव्यात अशा कविताही आहेत. मुलांना जे जे रुचेल ते देतानाच खुबीने त्यातून संस्कार घडावेत अशी प्रत्येक कथेची रचना आहे. एकनाथ आव्हाड यांचा हा सातवा बालकथासंग्रह आहे. पहिल्या सहा कथासंग्रहांप्रमाणेच यातील मुख्य व्याQक्तरेखा शमी आणि बाळू हे बहीण-भाऊ आहेत. ही दोन्ही पात्रे बालवाचकांना आव्हाड यांच्या कथासंग्रहांमधून सतत भेटल्याने, परिचित झाल्याने आपलीशी वाटणे, त्यामुळेच शमी आणि बाळूच्या या नव्या कथा वाचण्याची उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे. या कथांची कथानकेसुद्धा मुलांचा उत्साह, उत्सुकता वाढविणारी आहेत.