आपण वाचतो, ऎकतो त्या कविता किंवा ती गाणी सगळीच काही आपल्याबरोबर वाढत नाहीत. काही भेटतात तेव्हा इतकी आवडतात, हलवतात की त्यांना वयाचा तो अख्खा टप्पाच बहाल असतो. पण मग नंतर त्यांचा कॆफ हळूहळू उतरत जातो. आपलं वय आणि समजूत थोडी थोडी वाढत जाते तेव्हा कधी त्या मागे राहिलेल्या कवितांविषयी थोडी हुरहूर वाटते आणि आपल्या त्या वयाला सुंदर केल्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता सुध्दा वाटते. काही कवितांचं आणि गाण्यांचं थोडं वेगळंच होतं. त्यांचं बोट सोडून आपण इतके दूर येतो, इतके वेगळे वाढतो की त्या कविता, ती गाणी आपल्याला कशी काय तेव्हा इतकी आवडली होती, याचंच आश्चर्य वाटतं. या सगळ्याच्या पलिकडे जाऊन कधी आणखीही काही घडतं. रात्रीच्या रस्त्यानं चालताना कोणत्याही वळणावर मान उचलून पाहिलं तरी चंद्र आपला दिसतोच. तसे काही कवी आणि काही कविता असतातच बरोबर. आणि कधी कधी काही कवितांवरची धूळ अचानक उडते. नव्या अर्थांनी उजळलेला चेहरा घेऊन नव्या वळणावर त्या अचानक पुन्हा भेटतात. प्रदीर्घ दुराव्यानंतर पुन्हा शाळेतली जुनी मॆत्रीण नव्यानं भेटावी आणि नव्यानं जवळ यावी तसं असतं ते. कवितेच्या वाटेवरचे असे अनेक अनुभव वाचकांबरोबर वाटून घेता घेता त्यांच्या रसज्ञतेला समृध्द करणारे लेखन.