आधुनिक विचारांचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या द्वितीय सूनबाई इंदुमती राणीसाहेब यांचे हे जीवनचरित्र आहे. शाहू महाराजांचे द्वितीय चिरंजीव प्रिन्स शिवाजी यांच्याशी सासवडच्या जगताप घराण्यातील इंदुमतीदेवींचा विवाह झाला. विवाहानंतर एकच वर्षानी प्रिन्स शिवाजी यांच्या अपघाती मृत्यूमुळे अवघ्या तेराव्या वर्षी इंदुमतीदेवींना आलेलं वैधव्य. शाहू महाराजांनी सुनेच्या शिक्षणाचा केलेला श्रीगणेशा. त्याला झालेला विरोध. सुनेला चारचाकी शिकवणार्या, तिला पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यवहारचातुर्य शिकवणार्या, स्वत:च्या मृत्यूनंतरही सुनेसाठी आर्थिक तरतूद करू पाहणार्या शाहूराजांच्या मृत्युमुळे इंदुमती देवींना डॉक्टर करण्याचं भंगलेलं स्वप्न. स्त्रियांसाठी शैक्षणिक संस्था काढून त्यासाठी झटणार्या, कलासक्त, वत्कृत्वनिपुण, कलाकारांना आश्रय देणार्या, उत्तम वाचक असणार्या, प्रसिद्धिपराङमुख इ. गुण असणार्या इंदुमती राणीसाहेबांचा हा जीवनपट त्यांच्या जीवनातील चढ-उतार तर दर्शवतोच, पण त्यांच्या समाजसेवी वृत्तीचं प्राधान्याने दर्शन घडवतो.