गेली सात तपं...हा आत्मा या शरीरात वस्ती करुन होता. हे शरीर...आता थकलं होतं. ते किती वर्षं वापरायचं? नैहर झालं, म्हणून काय झालं?ज्या आत्म्याच्या उध्दारासाठी म्हणून हे शरीर लाभलं होतं, त्या शरीराची आता आसक्ती नव्हती, तर निवृत्ती होती. त्या भव्य सुरात आपला सूर मिळवण्याची आतुरता! तंबोरा झंकारत होता. बेगमचा आवाज कानांवर पडत होता. नैहर छुटो जाय... आता...मिटलेल्या डोळ्यांसमोर फक्त पांढराशुभ्र प्रकाश दिसत होता. एक निळं सरोवर...आणि त्या पलीकडलं हिमालयाचं बर्फाच्छादित शिखरही... एक उत्तुंग शिखर...कांचनगंगा! त्या शिखरावर ध्यानस्थ झालेला वालुकेश्वर माईला आज प्रथमच स्पष्ट दिसला. तो नजरेसा दिसावा, म्हणूनच तर होतं हे वैराग्य! कांचनाच्या पायघड्यांवरुन चालणारं, अंजनीचं जीवन पार गंगेच्या प्रवाहापाशी पोचलं होतं. गंगेइकंच् पवित्र, विशाल. अंजनी स्वतच बनली होती कांचनगंगा! जिथं..फक्त. नादब्रम्ह झंकारत होतं!