खरेदीखत हा ‘कागूद’ या लघुकादंबरीचा साधा विषय. परंतु ‘कमवा व शिका’ योजनेत पदवीपूर्व वर्गात शिक्षण घेणारा अल्पभूधारकाचा मुलगा या चक्रव्यूहात ओढला जातो. घरात शेतीच्या तुकड्यावर जिवापाड प्रेम करणारी माणसं. हा ‘कागूद’च आपल्या शिक्षणाच्या आड येण्याचं भय नायकाला छळते. गावठी तिढ्यातून सुटका करीत तो पुढे जातो. त्याचा हा रसरशीत अनुभव बरेच धडे शिकवतो. ग्रामीण वास्तवाची धगच त्याला घडवत असते. ‘कागूद’ मातीचे गुण घेऊन उतरली आहे.
खेड्यात घर बांधण्याचा गिरणी कामगाराचा विदारक अनुभव किती विविध अंगांनी फुलू शकतो, हे ‘सावली’ने दाखवून दिले आहे. गतशतकाच्या अखेरीचा कापडगिरणी कामगारांचा संप ही तिची पार्श्वभूमी आहे. एकत्र कुटुंब, भाऊबंदकी, दारिद्य्र, शोषण असे अनेक धागे या ‘सावली’च्या पोतात कौशल्याने गुंफलेले दिसतील. कोरीव लेण्यासारखी तिची रचना आणि बंदुकीच्या गोळ्या सुटाव्या असे प्रभावी संवाद वाचक विसरूच शकत नाही. या दोन अस्सल ग्रामीणलघुकादंबर्यांना मैलाच्या दगडाचा मान मिळाला आहे. त्या नेहमीच वाचकांना भारावून सोडतात.