शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या गावगाड्याचे यथार्थ दर्शन दीपध्वज कोसोदे यांनी आपल्या कथांमधून घडविले आहे. ग्रामीण जीवनाचे, शेतकरी-कष्टकरी वर्गाचे जगणे या कथांमधून मार्मिकपणे रेखाटण्यात आले आहे. साधी, देवभोळी व अंधश्रद्धाळू माणसे, त्यांची जगण्यासाठीची कसरत, प्रामाणिकपणे कष्ट करून नेकीने जगण्याची त्यांची रीत जशी या कथांमधून दिसते, तशी सरकार दरबारी होत असलेली अडवणूक, दप्तर दिरंगाईमुळे आलेली अगतिकता, पैसेवाल्यांकडून होणारे शोषण याचेही अतिशय वास्तववादी वर्णन लेखकाने या कथांमध्ये केलेले आहे.ग्रामीण जीवनाचे डोळसपणे निरीक्षण करून, त्यातील खाचाखोचा, बारकावे पोटतिडकीने मांडलेले आहेत. गाव-मातीत घडणार्या बारीकसारीक गोष्टी, उद्भवणार्या समस्या, त्यामुळे आलेली हतबलता, त्याचे मानवी मनावर उठणारे ओरखडे यांची अतिशय गंभीरपणे दखल घेऊन या कथा लिहिल्या आहेत. या कथा भूक, दारिद्य्र,अज्ञान, अंधश्रद्धा, उपेक्षा आणि शोषण यांच्या विळख्यात सापडून जगणार्या सामान्य माणसाचे व्याकूळ हुंदके वाचकांपर्यंत पोहोचवणार्या आहेत. ग्रामीण बोलीतील नव्या शब्दकळेने या कथांची लज्जत आणखीच वाढली आहे.