गरिबी आणि हालअपेष्टा यांच्यापेक्षा विमुक्तांविषयींचे पूर्वग्रह हे त्यांना समाजापासून तोडतात - जन्मापासून, नव्हे जन्माआधीपासून ते गुन्हेगार आहेत हा सार्वत्रिकपणे, विचार न करता सर्रास गृहीत धरला गेलेला समज. या विस्मृतीत गेलेल्या जमाती म्हणजे एका अर्थी भारताच्या छोट्या प्रतिकृतीच आहेत. दारिद्र्य हा त्यातील महत्त्वाचा घटक पण त्याहून अधिक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांच्याविषयीचे जनमानसातील पूर्वग्रह. या कारणांमुळे विमुक्तांचा इतिहास आणि त्यांचे भवितव्य माझ्या स्वत:च्या (एक भारतीय म्हणून) भवितव्याविषयी खूप काही सांगून जाते. हे मला फारसे उत्साहवर्धक वाटत नाही. या सर्व कारणांमुळे मला हे पुस्तक लिहावेसे वाटले.