कथाकार, कादंबरीकार, नाटककार, प्रवासवर्णनकार, विनोदकार म्हणून जयवंत दळवी यांचे साहित्यात मोठे योगदान आहे.मात्र कथाकार म्हणून त्यांची रचनाशैली वैविध्यपूर्ण अशीच आहे.वासनांचे, सुखदुःखांचे दशावतार त्यांच्या कथांत दिसतात.आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते. कामभावनेच्या माणसाच्या मनावर वेगवेगळा झालेला परिणाम ते अतिशय सूक्ष्मपणे रेखाटतात. गहरी प्रेम भावना हा त्यांच्या कथेचा मुख्य विषय आहे. त्यांच्या कथेत काही वेळेस वेडी, अर्धवट पात्रे येतात. जीवनातील विविध क्षेत्रातील विसंगतीचे अचूक व मार्मिक दर्शन घडवायचे व ते घडवताना वाचताना हसवीत अंतर्मुख करावयाचे ही फारच अवघड कसरत आहे व ती फार थोड्यांना साधली. त्यात दळवीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. गंभीर कथालेखनासोबत दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणाऱ्या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे त्यांनी लेखनातून सिद्ध केले.