‘अनुवाद’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाषाव्यवहार आहे. त्यामुळेच अनुवादाला ‘सांस्कृतिक सेतू’ म्हटले गेले आहे. अनुवाद-व्यवहार हा अनेक अर्थाने व्यापक भाषाव्यवहार आहे. अनुवाद करणे हे एकच क्षेत्र घेतले, तरी या व्यवहारात स्रोत भाषा, लक्ष्य भाषा, मूळ पाठ, अनुवादकाची योग्यता, अनुवाद वाचकाचा हेतू अशी अनेक कारकतत्त्वे समाविष्ट असल्याचे दिसून येतात. या कारकतत्त्वांची मीमांसा केल्याशिवाय अनुवादाचा चिकित्सक अभ्यास अपूर्णच राहील. अनुवाद कार्याला वैज्ञानिक अधिष्ठान देणेही गरजेचे आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ‘अक्षरभारती अनुवाद अकादमी’ ही संस्था इतर संस्थांच्या मदतीने हिंदी व मराठीतील एक-एक साहित्यप्रकार घेऊन त्यातील अनुवाद-कार्याविषयी चर्चासत्रांचे आयोजन करीत असते. ‘हिंदी कादंबर्यांची मराठी भाषांतरे’ ह्या चर्चासत्रात सादर केलेल्या निबंधांचे येथे संकलन केले आहे.
या ग्रंथामधून अनुवाद समीक्षेच्या काही दिशा ठळकपणे पुढे येतील व ह्या अभ्यासक्षेत्राचे महत्त्वही अधोरेखित होईल.
- संपादक