आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.त्यांच्या 'द गाइड' या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये 'साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित 'गाइड' हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.आज पाच दशकं उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले.एका सामान्य भोगवादी राजू गाइडचं आध्यात्मिक 'स्वामी'मध्ये रूपांतर होऊ शकतं?एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेणं, राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चौकटीत बसतं?मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता? तो योग्य होता का?यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.सर्जनशीलतेचा ध्यास, ज्ञान-संशोधनाचा ध्यास, भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणार्या मूळ इंग्रजी कादंबरीचा उल्का राऊत यांनी सिध्द केलेला हा अनुवाद. कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी, अत्यंत रोचक व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली ही कादंबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते- गाइड!