शब्द आणि शब्दांनी तयार झालेली भाषा ही मानवाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. हे शब्द, ही भाषा दैनंदिन व्यवहाराचे साधन, ज्ञानसंपादनाचे माध्यम असते. प्रत्येक भाषेतील शब्दसौंदर्य हे त्या समाजाच्या संस्कृतीचे दर्शक असते. अठरापगड जाती तसेच शहरी व ग्रामीण भागात विभागलेल्या भारतीय समाजात वापरात असलेल्या बोली भाषेतील अनेक शब्द हे अभिव्यक्तीच्या दृष्टीने अतिशय प्रभावी, अचूक अर्थ प्रकट करणारे आणि ताजे टवटवीत असतात. परंतु हे शब्द वापरात राहिले नाही तर ते विस्मृतीत लोप पावतात. आपल्या लोकजीवन आणि लोकसंस्कृतीतील कितीतरी शब्द ‘अर्थपूर्ण’ असूनही हळूहळू लोप पावत चालले आहेत. अशा लोप पावत चाललेल्या बोलीमधील शब्दांची अतिशय मनोरंजक ओळख या संग्रहातून करून दिली आहे. या शब्दांची ओळख करुन देताना, त्यांच्या व्युत्पत्तीवर फारसा भर न देता ग्रामीण लोकजीवनात तो कसा, कोणत्या अर्थाने वापरला जात होता, त्याचा विस्तार कसा होत गेला, यावर अधिक भर देण्यात आला आहे. लोप पावणाNया लोकसंस्कृतीच्या या शब्दरूपी सुवर्णमुद्रांना झळाळी देण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न.