गालिबचे काव्य एक अनोखे सौंदर्यविश्व आहे. परंपरापूजन आणि बंडखोरी ह्यांचा समन्वय साधून निर्माण झालेल्या
या अदभुत विश्वात रसिकाचा प्रवेश झाला की, जीवनाच्या व्यामिश्र अर्थानुभूतीची विस्मित करणारी क्षेेत्रे त्याला आश्चर्यमुग्ध करून टाकतात. जीवनातील हर्षामर्षाचे, आधुनिकतेचे आणि नावीन्याचे कालभानासहित यथार्थ आकलन असणार्या आणि उर्दू शायरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वश्रेष्ठ असणार्या गझलसम्राटाचे विरोधाभासांनी व्यापलेले, तथापि विश्वकरुणेने ओथंबलेले व्यक्तिमत्त्व तद्वतच जीवनाच्या भावमधुर रसरंगात आकंठ बुडालेले आणि नवनव्या अर्थाची क्षितिजे विस्तारीत जाणारे काव्य समजून घेणे आणि समजावून सांगणे इतके सहजसुलभ नाही.
ज्ञानाचे जाळे कसेही पसरा पण माझ्या वाणीचा पक्षी त्यात अडकणारच नाही, अशा प्रतिज्ञेने निर्माण झालेल्या त्याच्या विमुक्त काव्याचा वेध घेणे हे एक आव्हान आहे.
ते आव्हान पेलून गालिबच्या शब्दाशब्दांत असणार्या विभिन्न अर्थशलाकांचा शोध डॉ. काळे ह्यांनी ह्या ग्रंथात घेतला आहे. त्याच्या अनवट शेरांतील आविष्काराची अपूर्वता आणि अनपेक्षितता आपल्या आस्वादक आणि अभ्यासपूर्ण
भाष्यांनी उलगडून दाखविली आहे.