"ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का? भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? देव इतरांची फसवणूक करतात का? आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात. "