एखाद्या व्यक्तीचा खाजगी पत्रव्यवहार प्रसिद्ध करणारी पुस्तके मराठीत अतिशय मोजकी आहेत. या ग्रंथात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि आनंदीबाई शिर्के यांच्यात इ. स. १९१३ ते १९३६ या कालावधीत झालेला पत्रव्यवहार संपादित केला आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे वाङ्मयीन कर्तृत्व विविधांगी आहे. त्यांचे आत्मवृत्त १९३६ साली प्रसिद्ध झाले. ‘हे आत्मवृत्त कोरड्या तपशीलांनी आणि वैयक्तिक भांडणांनी भरलेले आहे., असे समीक्षकांचे मत आहे. ‘आत्मवृत्त’ लिहिताना कोरडे वाटणारे कोल्हटकर आनंदीबाईंना लिहिलेल्या पत्रांत खुले आणि मोकळे होतात. कोल्हटकर आणि आनंदीबाई या दोघांच्याही आत्मचरित्रातील मोकळ्या जागा भरून काढण्याचे काम हा पत्रव्यवहार करतो. या पत्रव्यवहारातून मराठीतील एक ‘साहित्य-सिंह’ आणि वाङ्मयनिर्मितीच्या क्षेत्रात नव्यानेच पाऊल ठेवणारी एक लेखिका यांच्यातील स्नेहबंध हळूवारपणे उलगडत जातो.