विसाव्या शतकातील कोशनिर्मितीचा अभ्यास करताना श्री. ग. रं. भिडे यांनी केलेला कोशविचार आणि विविध कोशनिर्मितीचा आवर्जून अभ्यास करावा लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात हाताशी सत्ता, संपत्ती किंवा इतर कोणतीही साधने नसताना आपल्या मनस्वी आणि फकिरी वृत्तीने त्यांनी हा‘ज्ञानयज्ञ’ पन्नास वर्षे केला. श्री. ग. रं. भिडे यांचे हे केवळ चरित्रच नाही, तर त्यांच्या कार्याचे महत्त्वमापन करणारे हे पुस्तक आहे. तत्कालीन सांस्कृतिक व्यवहार यातून समजतो. याशिवाय लेखिकेच्या आत्मचरित्रातील काही पानेही यात दडलेली आहेत. श्री. ग. रं. भिडे यांच्या कार्याचे पुनर्मूल्यांकन होऊन त्यांची नोंद अधिक स्पष्टपणे घेतली आणि त्या कार्याचे मोल आजच्या पिढीने समजून घेतले तर ह्या पुस्तकाचा हेतू सार्थ झाला असे म्हणता येईल.