“माझे आयुष्य हा एक अंतर्बाह्य दोला म्हणजे झोका. हे परिपूर्ण आत्मचरित्रही नाही. लग्न झालं तेव्हा मी एकवीस आणि प्रवीण तेवीस वर्षांचा. बत्तिसाव्या वर्षी पतीला पाठीच्या मणक्याची मोठी इजा होते आणि त्याचवेळी मी डिप्रेशन म्हणजे औदासीन्याशी झगडत होते. मनोरुग्णतेशी झगडताना अंथरुणाला खिळलेल्या पतीची काळजी घ्यायची होती. परीक्षा अन संघर्षाचा काळ होता.याच वेळी हॉलिवूड नट ख्रिस्तोफर रीव मदतीला धावून आला. स्वतःच्या दुर्बलतेशी झगडण्याची मानवी शक्ती देऊन गेला.प्रवीण आणि माझे जगणे म्हणजे न हरलेल्या वेदनेची कहाणीच बनले. मनातील राक्षसांशी लढा देऊन मी गंभीर दुखण्यातून झगडत बाहेर आले.कथा-पुराणात नायक-नायिकांच्या छळांच्या अन् वनवासांच्या गोष्टींपेक्षाही आमचा हा १६ वर्षांचा प्रवास आहे. प्रवास अजूनही संपलेला नाही. संघर्षाशी आणखी खेळ सुरूच आहे.श्रद्धा आणि अध्यात्मानं जगण्याच्या संघर्षाचं बळ दिलं. एकेका संकटात जीवनाच्या झोक्याचा तोल सुटण्याअगोदर श्रद्धेने जगण्याची पकड घट्ट केली. माझा आणि प्रवीणचा हा हार न मानलेल्या जोडप्याचा संघर्ष आत्माविष्काराची कहाणी होवो!माझ्या या लेखनात मनाच्या चिंध्या गुंडाळून बसले. माझी जायची वेळ येईल तेव्हा देखणी भरजरी पैठणी नेसलेली असेल.”