मुंबई-पुण्यात या तरुणांना करिअरची नवी क्षितिजे दिसतच असतात; पण ग्रामीण भागातल्या तरुणांपासून ती कैक योजने दूर असल्याचे जाणवत राहते. त्यामुळेच क्षमता आणि उमेद हे दोन्ही असूनही ग्रामीण भागातील तरुण करिअरच्या नव्या क्षितिजाकडे झेप घेऊ शकत नाहीत. प्रा. रामानंद व्यवहारे यांनी फॅशन, चित्रपट, जाहिरात, मॉडेलिंग, चित्रवाणी, नभोवाणी या ग्लॅमरस क्षेत्रांबरोबरच नर्सिंग, दुग्ध व्यवसाय, औषधनिर्मिती आदी वैज्ञानिक विषयांशी संबंधित क्षेत्रांची माहितीही जमविली आहे. युद्धशास्त्र, सेनादल या क्षेत्रात प्रशिक्षित तज्ज्ञांची सदैव गरज असते, तरी माहितीच्या अभावी मराठी तरुण त्यापासून वंचित राहतात. प्रा. व्यवहारे यांनी संकलित केलेल्या माहितीमुळे ही क्षेत्रेही तरुणांच्या आवाक्यात येऊ शकतील.विविध ज्ञात व अज्ञात क्षेत्रांवर तपशीलवार माहिती गोळा करून ती नेमक्या शब्दात वर्तमानपत्रीय स्तंभात उतरविणे हे काम सोपे नव्हे. माहितीच्या तपशिलात थोडीफार कसूर झाली तरी अनर्थ होऊ शकतो. प्रा. व्यवहारे यांनी हे जिकिरीचे काम कसोशीने पूर्ण केले आहे. त्यांची वृत्ती, उत्सुकता संशोधकाची आहे आणि लेखणी समजूतदार शिक्षकाची आहे. ‘दिशा करिअरच्या’ हे पुस्तक तरुणांच्या जीवनात दीपस्तंभ ठरेल. असा विश्वास वाटतो.भारतकुमार राऊत संपादक, महाराष्ट्र टाइम्स